जावे संशोधनाच्या गावा..

गेल्या काही वर्षांत देशात विज्ञानविषयक संशोधनाला महत्त्वाचे स्थान मिळत आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक संशोधन शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे मनासारखे करिअर करणे शक्य झाले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन शाखेकडे वळावे, यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे.

संशोधन क्षेत्रातील करिअरसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (NEST- नेस्ट) एक उत्तम संधी उपलब्ध करून देते. या टेस्टद्वारे भुवनेश्वरस्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या मास्टर ऑफ सायन्स या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो.

देशभरातील १०६ केंद्रांवर नेस्ट संगणक टर्मिनल आधारित ही परीक्षा घेतली जाते. नागपूर, पुणे, मुंबई, भोपाळ, अहमदाबाद, इंदोर, रायपूर आदी काही परीक्षा केंद्रे आहेत. येत्या २ जूनला (२०१८)ही परीक्षा घेतली जाईल. १८ जूनला संस्थेच्या संकेतस्थळावर त्याचा निकाल जाहीर होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल ५ मार्च. या परीक्षेसाठी खुल्या आणि इतर मागासवर्गीय संवर्गासाठी १००० रु. इतके शुल्क आहे. तर अनुसूचित जाती आणि जमाती, शारीरिकदृष्टय़ा अपंग आणि सर्व संवर्गातील महिलांसाठी ५०० रुपये. या दोन्ही संस्था शासनाच्या अख्यत्यारीतील असल्याने अत्यल्प शुल्कांमध्ये हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.